Home » जळगाव » म्हसावद –  बोरनार येथे लवकरच मोठा सौर प्रकल्प उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

म्हसावद –  बोरनार येथे लवकरच मोठा सौर प्रकल्प उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील वीज म्हणजे शेतकऱ्याच्या पिढ्यांची आशा आहे. जिल्ह्यात कधीच निधीचा अडथळा होऊ दिला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निधीची कधी कमतरता भासू दिली नाही, शेतकऱ्यांच्या शिवारात अंधार असू नये, त्याला दिवसा वीज मिळावी यासाठी कटिबद्ध असून पुढील टप्प्यात सौर प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार असून म्हसावद – बोरनार येथे मोठा सौर प्रकल्प उभारला जाणार असल्याचे सुतोवाच केले. मे महिन्यात ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करणार असून म्हसावद येथिल बंधाऱ्याच्या  दुरुस्तीसाठी ५० लक्ष निधी मंजूर करणार असून म्हसावद ते नागदुली ३३ के.व्ही. लिंक लाईनचे लोकार्पण म्हणजे ग्रामीण जनतेच्या आशेला वीजेचा उजेड असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते म्हसावद येथे म्हसावद ते नागदुली ३३ के.व्ही. लिंक लाईन प्रकल्पाचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता जी.टी. महाजन यांनी सांगितले की, म्हसावद ते नागदुली या ३३ के.व्ही. लिंक लाईनच्या प्रकल्पासाठी DPDC अंतर्गत सुमारे १ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर प्रकल्पाचा लाभ म्हसावद, वावडदा, बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, डोमगाव, पाथरी, वडली, रामदेववाडीसह ,जळके, विटनेर आजूबाजूच्या तांड्यांतील घरगुती ग्राहक व शेतीपंप धारकांना होणार असून १९ गावांसह जळगाव शहराच्या उपनगरातील हजारो ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा शक्य होणार आहे. म्हसावद व परिसरातील हजारो जनतेला आश्वासक ऊर्जा दिली असून शहरी तसेच ग्रामीण भागातील सुमारे ४-५ लाख नागरिकांना या प्रकल्पाचा थेट लाभ होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सभापती यशवंत पवार यांनी केले. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता अर्जुन आव्हाड यांनी केले. आभार उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांनी मानले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती यशवंत पवार, सरपंच गोविंदा पवार, उपसरपंच संजय मोरे, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, समाधान चिंचोरे, नारायण चव्हाण, महावितरणचे कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, उप कार्यकारी अभियंता विजय कापुरे, कनिष्ठ अभियंता अर्जुन आव्हाड, सहाय्यक अभियंता संदीप बडगुजर, ग्रा.पं. सदस्य बापू धनगर, अमोल कोळी, इंदल भोई, डॉ. सुधाकर पाटील, विश्वनाथ मंडपे, कैलास पाटील, गार्गी इलेक्ट्रिकलचे कॉन्टॅक्टर यामिनी नारखेडे, निलेश झांबरे तसेच महेंद्र राजपूत, सुनील बडगुजर, शितल चिंचोरे यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!