A new academic year begins : उन्हाळी सुटी संपून आजपासून शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. ढोलताशांच्या गजरात व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शालेय स्तरावर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला आजपासून सुरवात झाली आहे. १ मेस निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशाचे वेध लागले होते. यादरम्यान उन्हाळी सुटी असल्याने शालेय प्रांगणात शुकशुकाट झालेला होता. परंतु आता शैक्षणिक वर्षाला सुरवात झाल्याने पुन्हा एकदा शालेय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला आहे.
दरम्यान आज शाळेच्या पहिल्या दिवशी मानव सेवा विद्यालयात प्रवेशोत्सव प्रसंगी नवीन शैक्षणिक वर्षात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी संपूर्ण शालेय परिसरात रंगीत पताका, फुगे लावून सजावट करण्यात आली. शाळेच्या परिसरातून विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून औक्षण करून व पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर्.एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, सदस्य सुभाष पाटील उपस्थित होते. तसेच तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका तसेच पालक सदस्य, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता शारदा मातेस फुलहार अर्पण करून पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.


इयत्ता १० वीत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या उपशिक्षिका अलका महाजन यांची सुकन्या साक्षी अनिल महाजन हिने इयत्ता १२ वीत ८२% गुण प्राप्त केल्याबद्दल व उपशिक्षक गिरीष जाधव यांची सुकन्या पियुषा गिरीष जाधव हिने इयत्ता १० वीत ९१% गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा देखील त्यांच्या पालकांसोबत सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत दिले जाणारे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीष जाधव यांनी तर आभार योगिता घोलाणे यांनी मानले.
