Home » महाराष्ट्र » महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

Maharashtra New Governor : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच आता राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी, रमेश बैस यांच्यानंतर राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहेत.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले.

या परिपत्रकात नवीन राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यानुसार सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. तर झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे सोपविण्यात येईल. त्यासोबतच महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन :
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आणि झारखंडचे माजी राज्यपाल आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी कार्य सुरु केले. ते कोईम्बतूरमधून दोन वेळा निवडून लोकसभेवर गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्र होती. या काळात त्यांनी रथयात्रा काढली होती. तसेच नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठीही त्यांनी आवाज उठवला होता. ते २०१६ ते २०१९ पर्यंत ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते.

दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती,

◆ विविध राज्यातील नवनियुक्त राज्यपाल :

  • सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र
  • हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
  • संतोषकुमार गंगवार – झारखंड
  • रामेन डेका – छत्तीसगड
  • सी. एच. विजयशंकर – मेघालय
  • ओमप्रकाश माथूर – सिक्किम
  • गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड
  • लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
  • जिष्णू देव वर्मा – तेलंगणा

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!