Lonavala Bhushi Dam : भुशी धरणाच्या परिसरात डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी धबधब्याच्या रुपात धरणात येते. वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली.
पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोणावळा येथे पावसाळी सहलीसाठी आलेल्या पाच पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेने भुशी डॅम परिसरामध्ये पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सूटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच भुशी डॅम परिसरात पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असुन लोणावळा परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस झाला असून राज्यसह देशभरातील पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. बॅकवॉटरमध्ये पर्यटक बुडाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून या ठिकाणी फिरायला येताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली होती. आत्तापर्यंत धरणाच्या पाण्यातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप दोन जणांचा शोध सुरू आहे.
पावसाची संततधार सुरू असल्याने रेस्क्यू टीमला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. लोणावळा परिसरामध्ये सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाली असून लांबच लांब वाहनाच्या रांगा देखील लागलेल्या आहेत.
भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असतात. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले. या दरम्यानच भुशी धरणाच्या वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना झाल्याचे समजते. शाहिस्ता परवीन (४०), अमीन अन्सारी (१३), मारिया अन्सारी (६), हुमेरा अन्सारी (६) आणि अदनान अन्सारी (६) अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत.
