Home » महाराष्ट्र » स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, ( प्रतिनिधि ) दि.२६ : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत हा भाव संविधानात आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व व्यसनांपासून मुक्त होऊन अमृत कलश हातात घेण्याचा संकल्प करणे, हाच खरा प्रजासत्ताक दिन आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित मान्यवर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आश्विनी लोनगाडगे, विष्णुवर्धन येरनी, राहुल पोहाणे, सुहास बनकर, ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धेतील सखी दोरखंडे, सई घिवे, कौशल्य, रोजगार व नाविण्यता विभागातर्फे विवेक अटलकर, अमियो दास, प्रिती पर्वे, सुरज गौरकार, प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक सर्वश्री राजेश मुळे, शिवाजी कदम, प्रवीणकुमार पाटील, महेश कोंडावार, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, पोक्सो कायद्याची प्रभावी जनजागृती केल्याबद्दल दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून ममता भिमटे, यशोदा राठोड, संदेश मामीडवार आदींचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!