जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी जळगाव द्वारा चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या एकलव्य क्रीडा संकुलामध्ये, खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चा एकलव्य क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या प्रसंगी त्या उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करतील आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांवर चर्चा करतील.

खेलो इंडिया KIRTI शिबिराचा उद्देश खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हा आहे. या शिबिरात राष्ट्रीय स्तरावर कुस्ती, बॉक्सिंग, धनुर्विद्या, हॉकी, खोखो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, व्हॉलीबॉल, फुटबॉल, आणि ऍथलेटिक्स या दहा क्रीडा प्रकारांमध्ये शारीरिक क्षमता चाचणी आणि कौशल्य विकास यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. याकरीता एकलव्य क्रीडा संकुलाचे ४० प्रशिक्षक आणि ३० स्वयंसेवक कार्यरत असतील.
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधून सुमारे ८ ते १० हजार विद्यार्थी या शिबिरात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आणि एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या सहभागाने हे शिबिर अत्यंत यशस्वी होईल. जळगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंसाठी हे शिबिर एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
