डोंबिवली | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला.
तप्त उन्हात डोक्यात भगव्या टोप्या घातलेले महिला, पुरुष, युवा कार्यकर्ते उत्साहाने या उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा इमारतींमधील रहिवाशांना रथावरील नेते अभिवादन करत होते. काही ठिकाणी सोसायटीमधून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी संभाजी शिंदे, लता शिंदे, वृषाली शिंदे, रुद्रांश शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे, अंबरनाथचे माजी शहराध्यक्ष सुनील चौधरी, कल्याण शहरप्रमुख रवी पाटील तसेच महायुतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
