Headlines
Home » शैक्षणिक » कजगाव येथे बबनबाई जवरीलाल माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून स्नेहसंमेलन

कजगाव येथे बबनबाई जवरीलाल माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून स्नेहसंमेलन

कजगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी | दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०००-२००१ या बॅचचे दहावीचे विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमले. जवळपास चाळीशीच्या उंबरठयावर असलेले सर्व मित्र एकत्र येत बालपणाच्या आठवणीत रमले. गावातुन बाहेरगावी नोकरी निमित्त गेलेले, सासरी गेलेल्या मुलीही या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. सकाळी एकत्र जमत सर्वांनी फेटे बांधून शिक्षकांसह वाजत गाजत गावातून मिरवणूक काढत जुन्या शाळेच्या परिसरात पोहोचले.

यावेळी दिवंगत शिक्षकांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेची प्रार्थना म्हणत पुन्हा एकदा शाळेत आल्यासारखे सर्वांना वाटत होते. सर्व मित्रांनी मिळून शिक्षकांचा सत्कार केला व शिक्षकांबद्दल असलेला आदर या सत्कारातून प्रत्येकाने दाखवून दिला. प्रत्येक मित्रांनी आपापला परिचय करून देत सध्या आपण काय करतो हे सांगितले. तसेच शालेय जीवनातील गमती जमती सांगत पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणीत हरपले. वर्गात बसल्यावर सर्वांना विद्यार्थी व शिक्षकांना सुद्धा आपण शिकवीत असल्याचा जणू काही भास होत होता.

यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ,”आम्ही दिलेले संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना द्या तसेच आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट लक्षात असू द्या त्यांना सांभाळा, मुलींनीही सासू-सासर्‍यांना आपले आई-वडील समजून त्यांची काळजी घ्या. आपल्या मुलांनाही हे संस्कार द्या. असे केल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही.” असा गुरु मंत्र दिला. सर्वांनी मिळून शिक्षकांचे औक्षण करत आशीर्वाद घेतला. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेत पूर्ण दिवस एकत्र घालविला. कार्यक्रमाला मुलांची व मुलींची संख्या लक्षणीय होती. शाळेसाठी काहीतरी वस्तू देण्याच्या उद्देशाने शाळेला खुर्च्या भेट म्हणून देण्याचे घोषित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे जेष्ठ शिक्षक एच. जे. पाटील व व्ही.एस. अमृते यांनी भूषविले. कार्यक्रमास उपस्थिती दिलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी गेलेल्या आपल्या मित्रांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कार्यक्रम दाखवत सहभागी करून घेतले. त्यांनी देखील मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत आपले मनोगत व्यक्त केले. मुलींपैकी सैन्यात असलेल्या मुलीचा यावेळेस सत्कार करण्यात आला. सैन्यात असलेली ही मुलगी या कार्यक्रमाला खास सीमेवरून येऊन उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन हरेश धाडीवाल, दीपक अमृतकर, अनिल महाजन, प्रमोद पवार, राहुल अमृतकर, अमोल जगताप, निलेश पाटील, अण्णा बोरसे, संदीप मोरे, राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला ब ज हिरण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पवार, माजी मुख्याध्यापक पी.बी. मोरे, बी.के. पाटील यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!