Headlines
Home » जळगाव » म्हसावद येथे नागरिकांकडून जामनेर ते शिरपूर या गाडीचे स्वागत

म्हसावद येथे नागरिकांकडून जामनेर ते शिरपूर या गाडीचे स्वागत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील म्हसावद हे गाव रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरत आहे. रेल्वे वाहतूकी सोबतच रस्त्याने बस प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असून म्हसावद हे गाव शिक्षण व बाजारपेठसाठीही महत्वाचे मानले जाते. यानिमित्ताने परिसरातील अनेक खेडेपाडे सदर गावास जोडले गेले आहेत. म्हसावद येथून पाचोरा, एरंडोल, जळगाव अशा तीन तालुक्यांशी सहज संपर्क साधता येतो. कामानिमित्त शेतकरी, व्यापारी, नोकरवर्ग, विद्यार्थी तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक उत्सवांमुळे सतत वर्दळ याठिकाणी असते. यामुळे गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

दरम्यान वाहतुकीच्या माध्यमातून थेट जामनेर तालुक्याशी संपर्क साधता यावा यासाठी म्हसावद येथील काही जागृत नागरिक बससेवेच्या प्रयत्नात होते. त्यांच्या बससेवेची मागणी व केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जळगाव विभाग नियंत्रक जगनोर यांनी म्हसावदच्या नागरिकांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जामनेर-शिरपुर बस सुरू केली. ही बस जामनेर येथून सकाळी ७:३० वाजता निघेल आणि म्हसावद येथे साधारणत: सकाळी सव्वाआठ ते साडेआठ वाजेपर्यंत पोहचेल.

सदर बस जामनेर येथून मार्गक्रमण करत व्हाया नेरी-म्हसावद-धरणगाव-चोपडा मार्गे शिरपूरकडे रवाना होईल. याबद्दल गावकऱ्यांकडून जगनोर यांचे हार्दिक आभार मानले आहे. याप्रसंगी बसचे वाहक व चालक यांचा थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी.डी. चौधरी आणि डॉ.राजेंद्र चिंचोरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीफळ फोडून बसचे स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील जागृत नागरिकांच्या प्रयत्नांना यश मिळाले, याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी प्रथम नागरिक संजय मोरे, गणेश आमले, थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी.डी.चौधरी, बच्छाव, योगराज चिंचोरे, पराग पाटील, सचिन चव्हाण, महाजन, प्रवीण पाटील, डॉ.राजेंद्र चिंचोरे, शंकर नाना, मोहन पाटील, ईश्वर चिंचोरे, लखन कुमावत, राजू पाटील, कालू बागवान, ग्रामपंचायत कर्मचारी मुसा, संजय शिंदे, एकनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.

पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!