Home » जळगाव » जळगावकर पुन्हा हादरले ; दादावाडीजवळ उड्डान पुलावर ॲम्बूलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट !

जळगावकर पुन्हा हादरले ; दादावाडीजवळ उड्डान पुलावर ॲम्बूलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इच्छादेवी चौकात महामार्गाला लागून असलेल्या एका दुकानात दहा दिवसांपूर्वी ओमनी गाडीत अवैधपणे घरगुती गॅस भरताना गाडीने पेट घेऊन झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले सात आणि इतर तीन असे दहा जण गंभीर भाजले गेल्याची घटना ताजी असतांनाच रात्री एरंडोलहून जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेमधील ऑक्सीजन सिलेंडरच्या झालेल्या स्फोटाने जळगावकर पुन्हा एकदा हादरले आहेत. शहरातील दादावाडी जवळील उड्डान पुलावर ही घटना घडली. स्फोटाच्या या आवाजाने परिसरातील नागरिकांत प्रचंड भिती निर्माण झाली. लांबवर ऐकू गेलेल्या या आवाजाने अनेकांना दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज वाटला, मात्र या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या कानठळ्याच बसल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.

दरम्यान रात्री ९:३० वाजेच्या सुमारास एरंडोलहुन जळगाव शहराच्या दिशेने शासकीय १०८ रुग्णवाहिका खोटेनगर येथून सुरु होणाऱ्या उड्डान पूलावरुन जात असतांना गाडीच्या गिअर जवळील भागात अचानक स्पार्किंग सुरु असल्याचे चालकाच्या लक्षात आले, आणि घडत असलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन चालकाने दादावाडीजवळ उड्डान पूलावर रुग्णवाहिका थांबवत डॉक्टर, प्रसूत महिला रुग्ण व तिच्या बाळास तसेच नातेवाईकास ताबडतोब खाली उतरवुन लांब उभे राहण्यास सांगितले. या वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या १०८ रुग्णवाहिकेत सदर प्रसूत महिला तिचे बाळ व इतरांना बसवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे रवाना करण्यात आले.

यानंतर काही क्षणातच रुग्णवाहिकेने पेट घेतला. आकाशात धुर आणि आगीचे मोठे लोट दिसू लागले. अनेक तरुण याठिकाणी आगीचे हे रौद्ररूप आपल्या मोबाईल मध्ये चित्रीत करत होते. अशातच रुग्णवाहिकेत असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. प्रचंड असा आवाज, आगीचे आणि धुराचे ऊंचच ऊंच लोट, त्यात दीड दोनशे फुट ऊंच उडालेले रुग्णवाहिकेचे अवशेष, आणि आपला जीव मुठीत घेऊन पळणारे तरुण, तसेच काही अंतरावर असलेल्या एका बँकेच्या एटीएम खोलीचे काचेचे दरवाजे फुटून काच सर्वत्र पसरले.

हे सारे काही एखाद्या चित्रपटातील ब्लास्टच्या दृश्याप्रमाणे प्रत्यक्षात घडतांना दिसत होते. सुदैवाने या भयंकर स्फोटात कोणतीही जीवित हानी किंवा कोणाला इजा दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या दोन बंबांद्वारे आग विझवण्यात आली.

घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे रूग्णवाहिकेने पेट घेऊन लागलेल्या आगीत ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे कळते. ऑक्सीजन सिलेंडर घटना स्थळापासून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुभाजक ओलांडून ६० ते ६५ फुट अंतरावर उड्डान पुलाच्या कठड्यावर फेकले गेले.

या स्फोटाचा आवाज इतका प्रंचड होता की, सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या परिघात हा आवाज ऐकू गेला. या स्फोटात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी सांगाडा तेवढा शिल्लक राहिला.

स्फोटात रुग्णवाहिकेचा पत्रा तसेच अनेक भाग आकाशाच्या दिशेने ऊंच उडाले आणि पुलावरुन दोन्ही बाजूने वरुन खाली फेकले गेले.

काही वेळाने रुग्णवाहिकेचा सांगाडा उड्डान पुलावर महामार्गाच्या कडेला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!