Headlines
Home » जळगाव » उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण ; पारा ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता !

उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण ; पारा ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्य भयंकर आग ओकत असून उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले आहेत. रविवारी तर तापमानाने नवा उच्चांक गाठला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाने ४४ अंशाचा टप्पा गाठला. तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत असून या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची जळगावकर असोशीने वाट पाहत आहेत.

मात्र, आगामी आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून या दरम्यान तापमान ४७ अंशावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. या आधी १९ ते २४ मे दरम्यान जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातच उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी शहरात तब्बल ४४ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. मे महिना सर्वाधिक उष्ण ठरत आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कडाक्याचे ऊन कायम असून अजून आठवडाभर ते जिल्हावासीयांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, आज सोमवारपासून पुढील काही दिवस तापमानात अजून एक किंवा दोन अंशाची वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात पारा ४५ ते ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सकाळी ११ वाजेपर्यंत घराबाहेरील कामे उरकून घेण्याची गरज आहे. तसेच दुपारच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात व परिसरात अवकाळी पाऊस होऊन गेला. त्यानंतर आता वातावरण पुन्हा कोरडे झाल्यामुळे गुजरात, राजस्थानकडून येणारे उष्ण वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पारा वाढला आहे. आठवडाभर तापमान हे वाढलेले राहिल. मात्र त्यानंतर म्हणजेच पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा घट होईल. २६ मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!