शहरात क्रेनचा धाक ! मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विदारक दृश्य
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जळगाव शहरात सध्या समांतर रस्ता आणि महामार्गावरील अतिक्रमणांविरुद्ध महानगरपालिकेने ‘हातोडा’ मोहीम तीव्र केली आहे. एकीकडे हातावर पोट घेऊन बसलेले रस्त्यावरील गरीब विक्रेते आणि जुन्या टायर विक्रेत्यांवर कडक कारवाई करून रस्ते मोकळे केले जात असल्याचा दावा प्रशासन करत आहे. मात्र, दुसरीकडे खुद्द जळगाव शहर महानगरपालिकेच्या १७ मजली मुख्य इमारतीखालीच अतिक्रमणाने विळखा घातला आहे. “दुसऱ्याचे डोळे पाहण्यापेक्षा प्रशासनाने स्वतःच्या बुडाखाली काय चालले आहे, हे आधी पाहावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
अंतर्गत रस्त्यावर कोल्ड्रिंकच्या गाड्यांचे साम्राज्य; कोणाचा वरदहस्त?

महानगरपालिका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या गोलाणी मार्केटच्या गाळ्यासमोरच पार्किंगच्या जागेत एका शीतपेय व्यावसायिकाने चक्क दोन मोठ्या हातगाड्या उभ्या करून सार्वजनिक जागा अडवली आहे. विशेष म्हणजे, या व्यावसायिकाचा गाळ्यात व्यवसाय सुरु असतानाही, मार्केटमध्ये येणारे ग्राहक आणि कर्मचारी ज्या अंतर्गत रस्त्यावर आपल्या दुचाकी लावतात तेथे या हातगाड्या लावण्यात आल्या आहेत.
या दोन हातगाड्यांमुळे किमान ८ ते १० मोटारसायकली पार्क होऊ शकतील एवढी जागा व्यापली गेली आहे. मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक दररोज याच इमारतीत ये-जा करतात, तरीही त्यांना हे ‘घरचे’ अतिक्रमण दिसत नाही का? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष घालून तात्काळ कारवाई केल्यास… कामाची तत्परता बघून नागरिकांच्या चेहऱ्यावर नक्कीच ‘मुस्कान’ येईल.

गोलाणी मार्केट: पार्किंग नावापुरती, समस्या पाचवीला पुजलेली
जळगाव शहरासाठी मोबाईलची मोठी बाजारपेठ असलेल्या गोलाणी मार्केटची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही आणि जिथे आहे तिथे अशाच प्रकारे व्यावसायिकांनी आपले साहित्य, बोर्ड आणि हातगाड्या लावून रस्ते अडवले आहेत. प्रशासनाकडून समांतर रस्त्यावर क्रेन घेऊन कारवाई केली जात असताना, गोलाणी मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांवर आणि पार्किंगच्या जागेत होणाऱ्या काही अनधिकृत व्यवसायांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप व्यावसायिक करत आहेत.
कारवाईत दुजाभाव? जनतेचा प्रशासनाला सवाल
नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासन थेट रस्त्यावर उतरले. भंगार बाजारातील टायर आणि वाहने जप्त करून रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र, हीच तत्परता मनपा इमारतीखालील आणि गोलाणी मार्केटमधील बड्या धेंडांच्या अतिक्रमणाबाबत का दाखवली जात नाही? गरिबांच्या पोटावर पाय देताना कायद्याचा बडगा उगारणारे प्रशासन, स्वतःच्या नाकाखाली सुरू असलेल्या नियमांच्या उल्लंघनावर गप्प का आहे? आश्चर्य म्हणजे गेल्याच आठवड्यात या गोलाणी मार्केटमध्ये साफ सफाई इव्हेंट(?)राबविण्यात आला होता.
“भ्रम नको, फक्त वास्तव” हेच की, प्रशासनाने स्वतःच्या इमारतीपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची सुरुवात करावी. तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी तैनात केलेल्या पोलीस अधिकारी वा कर्मचारी यांनी कोण्या भाऊ, दादा, मामा, आप्पा कडून आलेल्या कॉलवरील ‘दबावात्मक सूचनां’कडे दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्याची जाण ठेवत जबाबदारी पार पाडावी… नाहीतर शहरात केली जाणारी कारवाई ही ‘महामार्गावरील कचरा हस्तांतरण कारवाई’ सारखा केवळ एक ‘इव्हेंट’ किंवा ‘दिखावा’ ठरेल…यात शंका नाही.


अद्ययावत बातम्या:
या पोर्टलवर देश-विदेशातील ताज्या बातम्या जलद आणि अचूकपणे दिल्या जातात. त्यामुळे वाचक नेहमी अपडेट राहतो.
विश्वासार्हता:
बातम्या सत्य आणि पडताळणी केलेल्या असतात, त्यामुळे चुकीची माहिती मिळण्याची शक्यता कमी असते.
विविध विषयांचा समावेश
राजकारण, शिक्षण, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य, मनोरंजन अशा सर्व क्षेत्रातील बातम्या एकाच ठिकाणी मिळतात.
सोपी आणि स्पष्ट भाषा:
भाषा साधी आणि समजण्यास सोपी असल्यामुळे सर्व वयोगटातील लोक सहज वाचू शकतात.
आकर्षक मांडणी:
पोर्टल/वृत्तपत्राची रचना आकर्षक असून बातम्या व्यवस्थित विभागांमध्ये मांडलेल्या असतात.
डिजिटल सुविधा:
मोबाईल आणि संगणकावर सहज वापरता येते. काही ठिकाणी व्हिडिओ, फोटो आणि लाईव्ह अपडेट्स देखील दिले जातात.
एकंदरीत पोर्टल /वृत्तपत्र आणि टीम निर्भीड, आपल्या लेखणीतून न्याय मिळून देणारी आहे, तसेच नावाप्रमाणे “भ्रम नको , फक्त वास्तव” आहे 😅👍
🌹धन्यवाद