‘गुलमोहर’ बंगल्याबाहेर अजूनही ‘करणवाल’ राज!
जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा
ज्या प्रशासनावर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची आणि शिस्तीची जबाबदारी असते, तेच प्रशासन स्वतःच्या साध्या-साध्या गोष्टींबाबत किती ‘सुस्त’ असू शकते, याचा एक जळजळीत नमुना जळगावात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची बदली होऊन आणि त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू होऊन आता महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर (गुलमोहर बंगला) जुन्याच महिला अधिकाऱ्याच्या नावाची सुवर्ण अक्षरालीत पाटी झळकत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या ‘दक्षते’चा नमुना मुख्य प्रवेशद्वारावरच उघड…
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘गुलमोहर’ बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर “मीनले करनवाल (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद” अशीच पाटी आजही दिमाखात उभी आहे. वास्तविक पाहता, प्रशासकीय राजशिष्टाचारानुसार जुन्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर आणि नवीन अधिकाऱ्याने पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने या पाट्या बदलणे अपेक्षित असते. मात्र, महिनाभरानंतरही जिल्हा परिषदेच्या बांधकाम किंवा सामान्य प्रशासन विभागाला या नावाचा फलक बदलण्याची तसदी घ्यावीशी वाटलेली नाही. यामुळे “जे प्रशासन स्वतःच्या संदर्भात दक्ष नाही, त्यांना जनतेच्या दक्षतेची आणि समस्यांची काय फिकर ?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
मीनल करनवाल यांचा जळगावातील कार्यकाळ आणि कामगिरी
२०१९ बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असलेल्या मीनल करनवाल या २० मार्च २०२५ रोजी नांदेड जिल्हा परिषदेतून बदली होऊन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून रुजू झाल्या होत्या.
• लोकभिमुख कामगिरी: जळगावमधील आपल्या सुमारे एका वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. विशेषतः जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावरील वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या ८६ उमेदवारांची अत्यंत पारदर्शक आणि समुपदेशनाद्वारे केलेली भरती प्रक्रिया कमालीची कौतुकास्पद ठरली होती.
• शासकीय गौरव: त्यांच्या याच उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याची, पारदर्शकतेची आणि लोकाभिमुख कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना त्यांच्या कारकीर्दीत ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी/सीईओ’ म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.
बदली आणि नवीन नियुक्ती
७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत मीनल करणवाल यांची पोकरा प्रकल्प संचालक (मुंबई) पदावर नियुक्ती झाली. हा प्रकल्प दुष्काळी भागातील शाश्वत शेती, जलसंधारण आणि हवामान अनुकूल कृषीासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली. नायर यांचा शहरी प्रशासनातील अनुभव ग्रामीण विकासासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाचा निष्काळजीपणा की केवळ औपचारिकतेचा खेळ?
सरकारी कार्यालये आणि अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवरील नावफलक ही केवळ सजावटीची बाब नसून ती प्रशासनिक जबाबदारी आणि अद्ययावत नोंदींचा भाग असते. अशा ठिकाणी महिनोन्महिने जुनेच नाव कायम राहणे म्हणजे संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. आज प्रश्न केवळ एका फलकाचा नाही…
प्रश्न आहे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा…
प्रश्न आहे जबाबदारीच्या जाणिवेचा…
आणि प्रश्न आहे — “जे स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत, ते जनतेच्या प्रश्नांकडे किती लक्ष देणार ?”

