Headlines
Home » शैक्षणिक » अनुभूती निवासी स्कूलची निकालाची परंपरा कायम; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलची निकालाची परंपरा कायम; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

१० वीत पलक सुराणा, तर १२ वीत अलेफिया शाकीर विद्यालयात प्रथम

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसंस्था

शैक्षणिक गुणवत्तेत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या येथील अनुभूती निवासी स्कूलने आयसीएसई (१० वी) आणि आयएससी (१२ वी) बोर्ड परीक्षेत यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या स्थापनेपासून (२००७) सलग १९ व्या वर्षी हा दैदिप्यमान निकाल लागला असून, यामध्ये १० वी मधून पलक सुराणा तर १२ वी मधून अलेफिया शाकीर यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

दहावीचा निकाल (ICSE)

या परीक्षेत पलक सुराणा हिने ९६.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. स्वयंम पाडे (९५.६० टक्के) द्वितीय, तर स्तुती गर्ग (९४.८० टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षेस बसलेल्या ३२ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक, तर १५ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले आहेत.

बारावीचा निकाल (ISC)

बारावीच्या निकालात अलेफिया शाकीर कुझेमा ९२.७५ टक्के गुणांसह प्रथम आली. ट्विंकल प्रकाश ललवाणी (९१.७५ टक्के) द्वितीय, तर आर्यमान बोथरा (८९.७५ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. या परीक्षेला १७ विद्यार्थी बसले होते आणि सर्वांनीच विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. इंग्रजी, अकाउंट्स, कॉमर्स, फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या सर्वच विषयांत विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली.

मान्यवरांकडून कौतुक

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे. “हे यश केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

अनुभवाधारित शिक्षणाची मोहोर

“स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक मूल्ये जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलची स्थापना २००७ मध्ये केली. स्थापनेपासूनच या संस्थेने उत्कृष्टतेचा ध्यास घेतला, यंदाही विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेचा लौकिक अधिक उजळविलेला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे द्योतक नाही, तर त्यांच्या सृजनशीलतेचे, मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचेही प्रतीक होय. या सुयशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर सहकारी तसेच पालकांचे अभिनंदन आहे. निसर्गरम्य वातावरणात घडणारे हे विद्यार्थी स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची शक्ती आणि क्षमता बाळगतात. देशाचे उज्ज्वल भविष्य अशा सूज्ञ विद्यार्थ्यांच्या हातात आहे, आणि अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कामगिरी याची खात्री पटवते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!