Headlines
Home » जळगाव » महात्मा गांधीजींचे विचार हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन

महात्मा गांधीजींचे विचार हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन

समारंभावेळी विद्यार्थ्यांसह गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत एस.बोकारे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गीता धर्मपाल

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

“महात्मा गांधीजींचे विचार कालही प्रासंगिक होते आणि भविष्यातही ते दीपस्तंभाप्रमाणे (लाईटहाऊस) जगाला मार्ग दाखवत राहतील,” असे गौरवपूर्ण उद्गार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी काढले. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
गांधीतीर्थ येथे आयोजित या सोहळ्यात डॉ. बोकारे यांच्यासह जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार आणि गीता धर्मपाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षणातील ‘ज्ञानतंत्रशाही’पासून सावध राहा

आपल्या दीक्षांत भाषणात डॉ. बोकारे यांनी सद्यस्थितीतील शिक्षण पद्धतीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “आज केवळ उपयोगितेवर आधारित शिक्षण दिले जात असून, ही एक प्रकारची डिक्टेटरशिप आहे. तंत्रज्ञानाच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या ‘ज्ञानतंत्रशाही’पासून आपण मुक्त व्हायला हवे, अन्यथा आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल.” गांधीजींच्या चरख्याचे उदाहरण देताना त्यांनी स्पष्ट केले की, चरखा हे केवळ सूत कातण्याचे साधन नसून ते आर्थिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते. आजही ग्रामोद्योगाच्या माध्यमातून गांधीजींची तत्त्वे यशस्वीपणे राबवता येतात.

९ राज्यांतील विद्यार्थी पदवीधर

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या या पदवी अभ्यासक्रमासाठी देशभरातील ९ राज्यांमधून १६ विद्यार्थ्यांनी (६ विद्यार्थिनी आणि १० विद्यार्थी) प्रवेश घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. रूपक दास, राखी कुमारी, सुशील आणि रजत या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण प्रवासातील अनुभव यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. “गांधीतीर्थ ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून व्यक्तिमत्त्व घडवणारे ‘तक्षशिला’ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर लक्ष न देता स्व-विकासावर भर द्यावा. विचार आणि कृती यांचा समतोल राखल्यास आपण जगाला अधिक चांगले बनवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले. हीच संकल्पना गांधीतीर्थचे निर्माते श्रद्धेय भवरलालजी जैन यांची होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

या कार्यक्रमात गांधीजींच्या जीवनावर आधारित लघुपट (डॉक्युमेंटरी) प्रदर्शीत करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले, तर दीपक मिश्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!