Home » सामाजिक » जागतिक महीला दिन

जागतिक महीला दिन

जागतिक महीला दिन का साजरा केला जातो ?
१९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महीलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतुने साजरा करावा यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार संपुर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महीला दिन’ साजरा केला जातो. तसेच महीलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच जागतिक महीला दिन . महीलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी महीला दिन साजरा करण्यात येतो. ‘जागतिक महिला दिन’ हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी ८ मार्च रोजी महीलांच्या कामगिरीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच लिंग समानतेचे महत्व पटवुन देण्यासाठी देखिल हा दिवस साजरा केला जातो. कारण आपल्या देशात मुलगी झाली म्हणजे ती नकोशी वाटत असे, मुलगा मुलगी एक समान मानले जात नसे. मुलाचा दर्जा नेहमीच मुली पेक्षा मोठा समजला जात होता. खरंतर मुलगी ही दोन कुळांचा उध्दार तसेच दोन कुटुंबाचा सन्मान करते. ती जन्मापासुन तर मृत्युपर्यंत तीला ती एक स्री आहे, तीचे हे काम नाही, ती हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तीला रात्री बाहेर पडता येत नाही… स्त्री विषयी अशा अनेक प्रकारच्या मानसिक दडपणात तिला आपले आयुष्य जगावे लागते. बऱ्याचदा तिला नोकरीच्या ठिकाणी किंवा तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिचा मानसिक छळ किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचारासारखे घृणास्पद कृत्य केले जाते. समाजात अशा प्रकारच्या अनेक समस्यांना ती सामोरे जात असते.

या सगळ्यातुन मग तिला कुठे तरी तिला मान, सन्मान मिळावा, तिला एक व्यासपीठ मिळावे, तिच्या कामाचे कौतुक व्हावे अशा विचारांत आलेल्या परिस्थितीला सामोरे जात सर्वांसोबत संघर्ष करून ती आपले आयुष्य जगत असते. म्हणुन महिलांना जागतिक महीला दिनाचे महत्व फार आहे. खरंतर महिला या आज पुरुषांच्या तुलनेत बरोबरीत किंवा एक पाऊल पुढे जाऊन काम करत आहेत. महिलांची जिद्द, चिकाटी, प्रचंड सहनशिलता असलेल्या जगत जननी नवचंडी यांना सर्वांना मी नमन करते. महिलांनी ठरवले तर त्या घराला स्वर्ग बनवू शकतात, आणि ठरवले तर नर्क देखिल त्या बनवू शकतात. महिला ह्या आपल्या आई, वडील, पती, मुलांसाठी सगळ्या प्रकारचे पात्र करु शकतात. एकाच वेळी चार काम करण्याची आपली कला आत्मविश्वास असे सारे काही आपल्यात आहेत. एक स्री म्हणुन जन्म घेतला तरी आपण आपल्या कुठल्याही जबाबदाऱ्या झटकु शकत नाही. त्या आपल्याला पार कराव्याच लागतात. आपण आयुष्यभर संघर्षच करत असतो. आपण कुठेही गेलो मग ते स्वतःच घर असेल, नातेवाईकाचे घर असेल, मित्र परीवार, आपले नोकरीचे ठिकाण असेल कुठेही आपल्याला कामच आहे. आपण खुप कमी वेळ स्वतःसाठी जगत असतो. बाकी संपुर्ण आयुष्य फक्त परिवारासाठी जगत असतो.

आजची स्री थोडी बदललेली आहे. खुप फ़िरण्यातुन एक गोष्ट लक्षात आली आहे ,ती म्हणजे आपण तासंतास मोबाईल मध्ये स्वतःला गुंतवुन घेतले आहे. त्यामुळे आपले आरोग्य तर खराब होतच आहे, शिवाय आपले कुटुंब व्यवस्था देखिल विस्कळीत होत आहे. मोबाईल हे एकप्रकारचे व्यसनच आहे, जे आपले आरोग्य तर बिघडवतचं आहे परंतु आपला अनमोल असा वेळ देखिल ते आपल्या हातुन हीरावुन घेत आहे. आज कुठल्याही वयातील पुरुष किंवा महिला आपण बघितले तर ते एकटे नसतातच. मोबाईल हातात असतोच असतो, मग कुणी मोबाईलवर बोलत असेल, तर कुणी गेम खेळत असेल, कुणी विडीओ तर कुणी चॅटींग करत असतो. या सर्वांमुळे आपले मानसिक आरोग्य व आपला स्थुलपणा याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपण लवकर चिडतो त्याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपले किती नुकसान झाले परिवाराकडे कसे दुर्लक्ष झाले. आपल्यात आपसातील कम्युनिकेशन गॅप कसा वाढला याबद्दल आपण विचार केला पाहीजे. एकीकडे आपण भरमसाठ प्रगती केली, तर दुसरीकडे आपण हे काय करतोय याची आपण थोडी पुसटसी जरी कल्पना केली तर फार बरं होईल. आपण म्हणतो मोबाईलमुळे तरुण पीढी वाचनापासुन लांब गेली. पण खरतर आपण पालक म्हणुन त्यांच्याकडे काय लक्ष घातले हे देखिल महत्वाचे आहे. आताची एक लेटेस्ट घटना आहे दोन चांगल्या घरातील मुली या एक गड किल्ल्यावर नशेत सापडल्या. त्यांनी ड्रग्ज घेतले होते. पुर्णपणे शुद्ध हरपली होती. मला सांगा कुठे चालली आहे आपली संस्कृती ? खुप अशा मुली आहेत की ज्या चहा काॅफीच्या कान्याकोपऱ्यातील ठिकाणी जाऊन स्मोकिंग करतात. हे सर्व दृष्य बघुन फारच वाईट वाटतं. म्हणुन आपल्याला एक आई म्हणुन आपण आपल्या पाल्यासाठी काय करत आहात ?त्यांच्यावर आपले किती लक्ष आहे ? हे खुप महत्वाचे विषय आहे.

आपण आज जागतिक महिला दिना निमित्त सर्वांनी संकल्प करूया, आपला देश हा महासत्ता बनवुया. राणी ताराबाई यांनी किती लढाया केल्या हे आपण जाणुनच आहात. तसेच आहील्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी या सर्व दिग्गज महीला आज इतिहासात अमर आहेत. यांच्यापेक्षा निश्चितच मोठे आपले युद्ध नाही. आपण सर्वांनी ठरवले तर आपआपला परिवार तरी आपण चांगला सांभाळु शकु, कारण बाहेर परस्थीती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. अजुनही वेळ गेली नाही स्वतःचे मुल्य जाणा आणि विचार करा. जगातली सर्वात महत्वाची व्यक्ती तुम्ही आहात. जसे आपण आपल्या देशाचे नाव देखिल माते वरून ठेवले आहे. भारत माता ही आपली माता आहे आपली आई आपली माता आहे. गाय देखिल आपली माता, असा आपला आदर्श देश आणि त्यातील तुम्हा सर्व मातांना पुन्हा एकदा जागतिक महीला दिना निमित्त खुप खुप शुभेच्छा ,जय हिंद जय महाराष्ट्र, जय जागतिक महीला दिन.
सर्व माता भगिनींना जागतिक महीला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

सौ.भारती ज्ञानेश्वर कुमावत
B.A, L.L.B, M.A (Psychology)
समांतर विधीसेवा सहाय्यक,
कोर्ट आवार जळगाव.
ज्ञानभारती फाउंडेशन अध्यक्षा,
समाजसेविका
मोबाईल नं : ८५३०१९५१५०

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!