Home » राष्ट्रीय » अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर ; प्रचारासाठी लवकरच मैदानात

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर ; प्रचारासाठी लवकरच मैदानात

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनमुळे आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीला मोठा फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी पार पडून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्चला अटक केली होती. गेल्या ५० दिवसांपासून ते तुरुंगातच आहेत. जुलै पर्यंत जामीन मिळावा अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी कोर्टाला केली होती. जामीन १ जूनपर्यंतच मंजूर झाला आहे म्हणून केजरीवाल यांनी २ जूनला स्वतः हुन पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे असे कोर्टाने म्हटले आहे.

सध्या अंतरिम जामीन मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ट्रायल कोर्टात पाठवली जाईल. त्यानंतर ट्रायल कोर्ट सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाला पाठवेल. त्यानंतर केजरीवाल यांची सुटका केली जाईल. ही प्रकिया आज संध्याकाळपर्यंत झाल्यास अरविंद केजरीवाल आजच तुरुंगातून बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या एक्स वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला असून, “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचामुळे फायदा होईल”, असे त्या म्हणाल्या.

मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना जामीन मिळाला होता. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, एजन्सीने केजरीवाल यांच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आणि ‘आप’ने केलेल्या गुन्ह्यासाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!