जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यास एकूण ९० हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत ८४,६०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी शबरी, रमाई, पंतप्रधान आणि मोदी आवास या चारही घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी दिले. तसेच, या योजनांमधील पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वन विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विकास कामांबाबत नियोजन विभागाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, वन विभागाचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रवीण ए., जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

■ १५ जून पूर्वी पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचे उद्दिष्ट
शासनाने मागील आणि विद्यमान घरकुल योजनांसह एकूण १,६०,००० ग्रामीण घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. १५ जून पूर्वी ही घरे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार, घरकुल योजना प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिले.
■ जिल्ह्यात २१ हजार लाभार्थ्यांना जागा उपलब्ध
घरकुल योजनांसाठी पात्र असलेल्या, पण स्वतःच्या मालकीची जागा नसलेल्या २१,००० लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासकीय नियमानुसार जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
