धर्मशाला | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज ०७ मार्च पासून धर्मशाळा येथे सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी झाली. नंतर मात्र त्यांच्या फलंदाजांनी भारतीय पिरकीपटूंसमोर अक्षरशः नांगी टाकली. २ बाद १३७ वरुन सर्वबाद २१८ असा त्यांचा डाव गडगडला. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं ५ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तर १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रविचंद्र अश्विनने ४ बळी घेतले. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक म्हणजे ७९,बेन स्टो २९, बेन डकेट २७ आणि रूट ने २६ धावा करून भारतीय फिरकीचा थोडाफ़ार प्रतिकार केला. शेवटी ५७.४ षटकात इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला.
टीम इंडियाने पाहुण्यांना २१८ धावांत गुंडाळल्यावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १३५/१ धावा केल्या. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वालने नेहमीप्रमाणे आक्रमक व आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची ताबडतोड भागीदारी केली. जैस्वाल पुन्हा एकदा आक्रमक होता, त्याने ५६ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकार मारुन अर्धशतक केले. मात्र, त्यानंतर २१ व्या षटकात शोएब बशीरच्या चेंडूवर जैस्वालला फोक्सने यष्टिचित केले आणि या सलामीवीराची खेळी संपुष्टात आली. पुढे शुभमन गिल आणि रोहित शर्माने नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. रोहितनेही २५ व्या षटकात ७७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित ५२ तर गिल २६ धावांवर नाबाद परतले .
या मालिकेत सलामीचा कसोटी इंग्लड जिंकला होता. नंतर मात्र सलग३ सामने जिंकून भारताने आधीच ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघानं मालिकेतील शेवटचा सामना जिंकला तर ११२ वर्षांनंतर कसोटी इतिहासात ऐतिहासिक विक्रम होईल. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुढील ४ सामने जिंकण्याचा हा विक्रम असेल.
