Home » क्रीडा » भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय ; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय ; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून रंगलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट थरारक विजयाने झाला. केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंडवर ६ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला आणि ५ सामान्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपवली. एक सामना बरोबरीत सुटला होता.

विजयासाठी ३७४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने झंझावाती सुरुवात केली. हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या दमदार शतकांमुळे सामना भारताच्या हातातून जवळपास निसटलाच होता. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी झाली. ब्रूकने १११, तर रूटने १०५ धावांची खेळी केली. मात्र शेवटच्या सत्रात प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव कोसळला.

भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी केवळ ४ गडी बाद करायचे होते, तर इंग्लंडला विजयासाठी केवळ ३५ धावांची गरज होती. अशा तणावपूर्ण वातावरणात सिराजने तीन आणि कृष्णाने एक विकेट घेत निर्णायक विजय मिळवून दिला. इंग्लंडचा दूसरा डाव अखेर ३६७ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. पहिल्या डावात केवळ २२४ धावा करून भारताने फलंदाजीत अपयश अनुभवले. करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. इंग्लंडकडून गस ॲटकिन्सनने ५ बळी घेत चमकदार कामगिरी केली.

प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात २४७ धावा करत २३ धावांची नाममात्र आघाडी घेतली. मात्र भारताच्या गोलंदाजांनी तेथेच सामन्यात पुनरागमन केले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत इंग्लंडचा डाव गडगडवला.

भारताचा दुसरा डाव निर्णायक ठरला. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने जबरदस्त शतक ठोकले. त्याने १६४ चेंडूत ११८ धावांची खेळी केली. आकाश दीपने नाईटवॉचमन म्हणून ६६ धावांची झुंजार खेळी करत महत्त्वाची साथ दिली. जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही अर्धशतकं करत भारताचा डाव ३९६ धावांपर्यंत पोहोचवला.

इंग्लंडचा दुसरा डाव थरारक ठरला. पहिल्या तिन्ही दिवसांमध्ये सामन्याचे चित्र सतत बदलत गेले. मात्र चौथ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कृष्णाने जेकब बेथेल आणि नंतर जो रूटला बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला. नंतर मोहम्मद सिराजने शेवटचे तीन गडी बाद करून डावात ५ बळी घेत विजय भारताच्या झोळीत टाकत मालिका २-२ ने बरोबरीत संपवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!