Headlines
Home » जळगाव जिल्हा » उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा; कारण हा श्वास जगण्याचा आनंद शिकवतो,” असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातपुडा जंगल सफारीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली बुकिंग करून जंगल सफारीत तब्बल दीड तास सहभाग घेत परिसराचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत आमदार अमोल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन विभागातर्फे पालकमंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सफारीदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती जाणून घेतली.

■ पाल अभयारण्यातील आकर्षण

सातपुडा पाल अभयारण्यात पर्यटकांसाठी अनेक निसर्गसंपन्न आणि अनुभवसमृद्ध ठिकाणे आहेत. यामध्ये लेक व्ह्यू पॉईंट हे विशेष आकर्षण ठरते. डोंगराच्या उंचावरून तलावाचे मोहक दृश्य पाहता येते. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इको हट पॉईंट हे पर्यावरणपूरक विश्रांतीस्थान असून बांबू आणि स्थानिक नैसर्गिक साहित्य वापरून बांधलेल्या झोपड्यांमध्ये बसण्याची सोय आहे.

हे ठिकाण कुटुंबासह शांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे. याशिवाय, सनसेट पॉईंट हे सायंकाळच्या वेळेस अप्रतिम सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. फोटोग्राफीसाठी सोबतच वाघडोह हे ठिकाण जंगल सफारीतील सर्वात रोमांचक भाग मानले जाते. येथे वाघ, बिबट्या यांच्यासह विविध वन्यजीवांचा अधिवास आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले. उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी प्रास्ताविकात जंगल सफारीची सविस्तर माहिती दिली, तर सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!