ठाणे, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्य परिवहन महामंडळाच्या ५१५० इलेक्ट्रिक बस योजनेचा लोकार्पण सोहळा आज ठाण्यातील खोपट एसटी स्थानकात पार पडला. एसटी ही राज्याची लाईफलाईन आहे. एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर यांचे कायमच गावकऱ्यांशी ऋणानुबंधाचे नाते आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान आहे. काळानुरूप एसटीमध्ये एनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात ५१५० संपूर्णपणे वातानुकूलित ई-बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर खोपट एसटी स्थानकाला अचानक भेट देऊन येथील सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी एसटी स्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी स्वच्छतागृहात पुरेशी स्वच्छता नसल्याचे तसेच विश्रांतीगृहांमध्ये पुरेशा सोयी सुविधा नसल्याचे निदर्शनास आले.

एसटी स्थानकातील स्वच्छता वाढवावी, कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याचा गिझर, थंड पाण्याचा कुलर तसेच झोपण्यासाठी व्यवस्थित बेडस उपलब्ध करून द्यावे. संपूर्ण स्थानकात स्वच्छता असावी असे निर्देश एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना दिले. ठाण्यातील खोपट एसटी स्थानक हे मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देशही त्यांना दिले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हा महिला संघटीका सौ.मीनाक्षी शिंदे, परिवहन सचिव पराग जैन, एसटीचे महाव्यवस्थापक डॉ. माधव पुसेकर आणि सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

