वाराणसी | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे १जून रोजी वाराणसीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १४ मे ही शेवटची तारीख होती. याच मतदारसंघातून नरेंद्र मोदी हे देखील उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८० लोकसभा मतदारसंघ असल्याने वाराणसीला एक विशेष राजकीय महत्त्व आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांचा ऐतिहासिक विजय झाला होता. त्याच मतदारसंघातून श्याम रंगीला देखील आता रिंगणात उतरला आहे. त्यामुळे यंदाची वाराणसीची लढत ही चांगलीच रंगणार असल्याची चिन्हं आहेत. या मतदार संघात ४१ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी एकूण २७ उमेदवारांनी आजच्या अर्ज दाखल केले आहेत.
श्याम रंगीला’लाअर्ज भरताना आल्यात अडचणी
दरम्यान, सोशल मीडिया एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर करताना श्याम रंगीलाने म्हटलं की, माझ्याकडे सगळी कागदपत्र असूनही माझा अर्ज स्वीकारला जात नाहीये. त्यांनी मला माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यास सांगितलं असल्याचा दावा देखील त्याने यावेळी केला आहे. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री केल्याने श्याम रंगीला ओळखला जाऊ लागला. त्याने अनेक मुद्द्यांवर कॉमेडी व्हिडिओही बनवले जे बरेच व्हायरल झाले आहेत.
