Home » जळगाव » कजगावात राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाचा विळखा;बाजारपेठ रस्त्यावर व्यापाऱ्यांनी थाटली दुकाने.

कजगावात राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाचा विळखा;बाजारपेठ रस्त्यावर व्यापाऱ्यांनी थाटली दुकाने.

कजगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – भडगाव तालुक्यातील कजगाव हे बाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कजगाव येथे रेल्वे स्टेशन असल्याने नेहमी प्रवाशांची कायम वर्दळ असते या गावांच्या आजुबाजुला खेडेपाडे, वाडा, वस्ती असल्याने या ३०-३५ गावातील नागरिकांचा दररोज काहींना काही कारणासाठी कजगावशी संपर्क येत असतो. गावातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र बाजारपेठेच्या रस्त्यावर टपरीधारक आणि व्यापाऱ्यांनी रहदारीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रस्त्यावरच आपली दुकानं थाटुन याठिकाणी अतिक्रमण केले आहे. गावातील मुख्य चौकात तसेच बस स्थानकात बस उभी करायला चालकांना मोठी कसरत करावी लागते. या परिसरात, स्टेशन रोड, नागद रोड महामार्गालगत भडगाव रोड, चाळीसगाव रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणी व्यावसायिकांनी पक्के अतिक्रमण करुन महामार्गावर अडथळे निर्माण केले आहेत. हा परिसर वर्दळीचा असल्याने याठिकाणी एखादे वाहन धडकल्यास मोठा अपघात होऊ जीवित हानी होऊ शकते. तरी संबंधित विभागाने हे अतिक्रमण तातडीने काढून अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई करावी.

कजगावात सध्या अतिक्रमण करण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे एकाने केले की दुसरा त्यापेक्षा अधिक अतिक्रमण करतो असे चित्र निर्माण झाले आहे. तसेच जुन्या गावात तर अतिक्रमणाची भीषण परिस्थिती आहे. पूर्वी जुन्या गावातुन मोठे वाहन सहज जात असे. परंतु सद्यस्थितीत अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने या गल्लीतुन दुचाकी चालविणे सुद्धा कठीण झाले आहे. नवीन बांधकाम करणारे देखील आपल्या हद्दिच्या बाहेर बांधकाम करून अतिक्रमण करीत आहेत. कजगाव विषयी जनसामान्य नागरिक म्हणत आहेत की, “गाव तसं चांगलं परंतु अतिक्रमणामुळे भंगल.” गावाला विद्रुप करणाऱ्या अशा अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी अनेकवेळा तक्रार अर्ज करण्यात आले. परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली नाही. कजगावात राष्ट्रीय महमार्गालगत वाढत चाललेले हे अतिक्रमण भविष्यात वाहतुकीसाठी व गावासाठी डोकेदुखी ठरणार असुन अतिक्रमणधारकांवर वेळीच कारवाई करावी व कजगाव अतिक्रमणापासून मुक्त करावे अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

 प्रतिक्रिया:
महामार्गावरील अतिक्रमण काढण्याचे काम हे पीडब्ल्यूडी असून त्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे, आणि ज्या व्यावसायिकांनी महामार्गावर अडथळे निर्माण होईल अशी पक्के बांधकाम केले आहेत, ते पण काढण्यात येईल: लोकेश महाजन महामार्ग अधिकारी

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!