“Dengue” : डेंग्यू हा जगातील सर्वात व्यापक आणि वेगाने वाढणारा वेक्टर-बोर्न रोग (VBD) म्हणून उदयास आला आहे. ११ पैकी १० सदस्य राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे, WHO दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाने जगातील मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणून डेंग्यूची नोंद केली आहे.
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पावसाळा सुरू झाला की विविध किटकजन्य आजारा मध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसार होणारे आजार अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात. पावसाळ्याच्या ऋतुत बहुतेकदा डास आणि कीटक वाढतात. याचा परिणाम लोकांना डेंग्यू सारखा धोकादायक आजार होतो. यामुळेच दरवर्षी १० ऑगस्ट हा ‘डेंग्यू प्रतिबंधक दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
■ डेंग्यू म्हणजे काय ?
डेंग्यू (डेन-गी) हा एडिस प्रजातीच्या (एडीस एजिप्ती) संक्रमित मादी डासांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरणारा एक विषाणूजन्य रोग आहे. हा फ्लूसारखा गंभीर आजार आहे जो डास चावल्यानंतर ५-६ दिवसांनी विकसित होतो. हा प्रादुर्भाव-प्रवण आजार म्हणून झपाट्याने उदयास येत आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी नेहमी पाणी साचते त्या ठिकाणी ‘एडीस’ सारख्या डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, म्हणून आपण ज्या परिसरात राहतो तेथे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आपल्याला डेंग्यू पासून काही धोका निर्माण होणार नाही.
■ डेंग्यूची लक्षणे
- सर्दी, खोकला, सांधेदुखी, १०४ फॅ तीव्र ताप येणे, मळमळणं आणि उलट्या, भूक मंदावणे, पोट दुखणे, त्वचेवर व्रण उठणं, छातीवर आणि हाताच्यावर वेदना इत्यादी.

■ डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी काही उपाय
◆ साचलेलं पाणी बदलणे
- कुलर, बादली आणि इतर भांड्यांमधील साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा बदलावे. डेंग्यूचे डास साचलेल्या चांगल्या पाण्यामध्येही वाढतात. जर आपल्या घरात असं साचलेले पाणी असेल तर डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी पाणी बदलण्यासोबत, पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे.
◆ हात-पाय झाकून ठेवणे
- डेंग्यूच्या प्रसरणाचा सर्वात मोठा ऋतू म्हणजे पावसाळा. सर्वांनी असेच कपडे घालावेत ज्यानं आपले हात-पाय झाकले जातील आणि डासांना चावण्यासाठी जागा मिळणार नाही. तसेच डासांपासून बचाव करण्यासाठीचं क्रीमही आपल्या त्वचेवर लावणं उत्तम.
◆ रात्री मच्छरदाणीचा वापर करणे
- रात्रीच्या वेळी डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. घरात डासांना पळवणाऱ्या स्प्रेचा सुद्धा वापर आपण करू शकतो. मात्र, ज्यांना असा स्प्रे वापरल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांनी मच्छरदाणीचा वापर करणं जास्त चांगलं आहे.
◆ ओला-सुका कचरा वेगळा ठेवणे
- घरात नेहमीच ओला सुका कचरा वेगळा ठेवावा. मात्र, पावसाळ्यात हे करणं अगदी आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात डेंग्यू पासून रक्षण करण्यासाठी डासांची ओल्या कचऱ्यामध्ये होणारी वाढ आपल्याला रोखता येईल.
◆ रुग्णांना सुरक्षित आणि मोकळं ठेवणे
- डेंग्यू पासून बचाव करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं डेंग्यू झालेल्या रुग्णाची काळजी घेणं होय. जर घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर त्याला चावलेला डास इतर कुणालाही चावू शकतो आणि त्यामुळे डेंग्यू पसरू शकतो, म्हणून रुग्णाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
(वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी आपल्या डॉक्टरांना भेटा).
