कजगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी | दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रेल्वे स्थानकात तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु असून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (पॉइंट मॅन) एक बॅग आढळून आली. सदर बॅग संबंधितांना ओळख पटवून परत करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कनाशी येथील सविता राजेंद्र पुजारी ह्या दवाखान्याच्या कामानिमित्त कजगाव येथून रेल्वेने जळगाव येथे जाण्यासाठी कजगाव रेल्वे स्थानकावर आल्या. घाई गडबड मध्ये त्यांच्याजवळ असलेली बॅग कजगाव रेल्वे स्थानकावर पडली.
दरम्यान सकाळी कजगाव स्थानकावर रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम करणारे कर्मचारी (पॉइंट मॅन) नेहमीप्रमाणे काम करत असतांना त्यांना सदर महिलेची ही बॅग आढळून आली. बॅगेत काही कागदपत्रे असतील त्यावरून बॅग च्या मूळ मालकासोबत संपर्क करता येईल, या हेतूने बॅग उघडली असता त्यात पैसे, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे आढळून आली.
बॅगेत असलेल्या आधार कार्ड वरून रेल्वे कर्मचारी (पॉइंट मॅन) यांनी संबंधितांना संपर्क करून तथा ओळख पटवून बॅगेतील पैसे आणि कागदपत्रे तपासून, खातरजमा करून साईट इंजिनियर सुमित कुमार, पोईसमन अंकुश बारी, पत्रकार अमिन शहा, पोईसमन विनोद हिरे यांनी ही बॅग महिलेचे पती राजेंद्र पुजारी यांच्याकडे हवाली केली. कर्मचाऱ्यांच्या या प्रामणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
