जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा करण्यात आले होते. या निमित्ताने सूर्य उपासनेचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यानाचे आयोजन मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सोहम योग विभागात करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित योगसाधक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार साधना केली आणि त्यानंतर व्याख्यानाचा लाभ घेतला. व्याख्यानामध्ये संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी ‘सूर्य उपासना: अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. वेदांमध्ये सूर्याचे महत्त्व वर्णन केलेले सुक्त, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सूर्य उपासना आणि आधुनिक युगामध्ये सूर्य ऊर्जेपासून राबवले जाणारे सौर उर्जेसारखे विविध प्रकल्प याविषयीची विस्तृत माहिती देवून नियमीत सूर्य उपासनेचे लाभसुद्धा त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले.
सोहम विभागाचे संचालक डॉ.देवानंद सोनार यांनी आपल्या मनोगतातून सूर्य उपासना आणि नियमीत सूर्यनमस्कार साधनेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.श्रद्धा व्यास यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ज्योती वाघ, प्रा.पंकज खाजबागे, प्रा.अनंत महाजन आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. आभार आणि शांतिपाठ करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. योगशिक्षक पदविका, बी.ए. आणि एम.ए. योगिक सायन्स विषयाचे विद्यार्थी आणि योग साधकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
