Home » महाराष्ट्र » लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने थांबवला ! निवडणूक आचारसंहितेचा फटका

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने थांबवला ! निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरु असून याचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे १० लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून सध्यातरी वंचित राहणार आहेत.

महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी बहीण’ योजना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजनांमध्ये मोडत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्याने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना सूचना देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक लाभाच्या योजना ताबडतोब थांबवल्या जाव्यात असे सांगण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांकडून याबाबतचा तपशील मागवला आहे. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने या योजनेतून निधी वितरण चार दिवसांपूर्वी थांबवल्याची माहिती आयोगाला दिली आहे.

२ कोटी ३४ लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच जमा झाला आहे. आचारसंहितेच्या आधीच पुढील महिन्याचा हप्ता मिळेल याची काळजी राज्य सरकारने घेतली होती. त्यामुळं ऑक्टोबर महिन्यातच दोन हप्ते महिलांना मिळाले आहेत. काही महिलांच्या खात्यावर चार ते पाच महिन्यांचे पैसे एकाचवेळी जमा झाले आहेत. वेळेअभावी केवळ १० लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!