जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहराच्या विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, आज दि २७ फेब्रूवारी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ही विकास प्रक्रिया जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि व्यावसायिक, औद्योगिक तसेच नागरी विकासाला गती देईल.

शासन निर्णयानुसार जळगाव विमानतळाच्या मूळ ४१ हेक्टर इतक्या जमीनीव्यतिरिक्त विस्तारीकरण करण्याकरीता एकूण २६७.७९ हे.आर. (२५० हे.आर १२.५९ हे.आर. ५.२० हे.आर) इतकी जमीन संपादनास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जळगाव विमानतळाच्या विकास/ विस्तारीकरणासाठी अंदाजे २५० हे. आर जमीन संपादन करण्यास प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मुंबई यांचेमार्फत प्रत्यक्षात २६२.५९ हे. आर इतके क्षेत्र संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे संपादीत करण्यात आलेल्या अतिरिक्त १२.५९ हे.आर. क्षेत्रास (२६२.५९ हे. आर वजा २५० हे. आर) कार्यार्योत्तर प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर संपादीत केलेले ५.२० हे. आर. क्षेत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून भारतीय विमानपत्तन प्राधिकारणाकडे हस्तांतरीत केले जाईल.

दरम्यान यामुळे हवाई वाहतुकीला चालना तसेच पर्यटन व व्यापारासाठी नवीन संधी निर्माण होऊन जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राला नवा वेग मिळणार आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणुकीचे दरवाजे उघडणार असून यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल.
सध्या नागरिकांना लांब पल्ल्याचा प्रवास हा रेल्वे किंवा बसने करावा लागतो. मात्र प्रवासात अधिक वेळ जातो. परंतु जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नागरिकांना प्रवासाचा जलद व आधुनिक पर्याय उपलब्ध होईल. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होऊन प्रवास सुखकर होणार आहे. विस्तारीकरणाचा हा ऐतिहासिक निर्णय जळगावच्या भविष्याचा नवा अध्याय ठरेल असे बोलले जात आहे.
