कल्याण, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. सत्ताधारी गटाच्या आमदाराने पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान महेश गायकवाड यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. मात्र चालताना त्यांच्या आतड्यांवर ताण पडत असल्यामुळे त्यांच्यावर आणखी २ ते ३ दिवस उपचार सुरू राहणार आहे.या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर असून महेश गायकवाड यांचे घर आणि ऑफिस बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे.
महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून महेश गायकवाड यांच्यावर डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर तब्बल तेरा दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आलेत यामधील टायगर इज बॅक, भावी आमदार आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
