Home » राजकीय » शेवटी ‘हातात’ पेटती ‘मशाल’ घेऊन ‘तुतारी’ वाजलीच ; महाराष्ट्रात मविआ’चे मोठे यश

शेवटी ‘हातात’ पेटती ‘मशाल’ घेऊन ‘तुतारी’ वाजलीच ; महाराष्ट्रात मविआ’चे मोठे यश

MVA GAINED IN MAHARASHTRA THAN NDA : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असुन भाजपा-महायुतीला अनपेक्षित झटका दिला आहे. राज्यात कोण असली आणि कोण नकली हे देशाला जनता जनार्दनाने दाखवून दिले.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे महाराष्ट्रातील जवळपास सगळेच निकाल जाहीर झाले असुन यामध्ये महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. महराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी १८ जागांवर भाजपा-महायुती तर २९ जागांवर इंडिया आघाडीने बाजी मारली आहे. तर अपक्ष एक उमेदवार विजयी झाला आहे.

महाराष्ट्रातील बारामतीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन होते. कारण बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होती. या मतदारसंघात शरद पवार तसंच अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात शरद पवार यशस्वी झाले आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना तर अजित पवार हे शरद पवार यांना सोडून महायुतीला जाऊन मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रायगडचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांचा पराभव केला. अजित पवार गटाचे ते विजयी झालेले ते एकमेव उमेदवार आहेत. अजित पवार गटाचे इतर सर्व उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले.

विदर्भात नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी झालेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांचा पराभव केला.

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीयमंत्री भाजपाचे नेते नारायण राणे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा यांचा पराभव केला.

मराठवाड्यात बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असुन तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. या ठिकाणी फेर मतमोजणी घेण्यात आली. परंतु त्यातही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात देखील बीडप्रमाणेच मोठा फेरबदल झाल्याचे दिसून आले. या मतदारसंघात फेरमतमोजणी करण्यात आली. यामध्ये शिंदे गटाचे रविंद्र वायकर विजयी झाले आहेत. केवळ ४८ मतांनी फेरमतमोजणीत रवींद्र वायकर यांचा विजय झाला असुन या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना पराभववाला सामोरे जावे लागले आहे.

उत्तर महाराष्ट्रात रावेर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे ह्या विजयी झाल्या आहेत. भाजपाने सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव केला. रक्षा खडसे या भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे – उबाठा) विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे शिवसेना गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला.

सुरवातीपासून चर्चेत राहिलेल्या सांगली मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (अपक्ष) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. तसंच याठिकाणी भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांचीही उमेदवारी होती.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले असुन त्यांनी भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांचा पराभव केला.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी झाले आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना अनिल देसाई यांनी पराभव केला.

दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. अरविंद सावंत यांनी या ठिकाणी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी विजय विजयी झाले असुन त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला.

जळगाव लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपाच्या स्मिता वाघ ह्या विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार करण पवार पराभूत झाले आहेत.

कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव केला. या मतदार संघाकडे देखील जनतेचे लक्ष लागुन होते.

अकोला मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केला. उल्लेखनिय बाब म्हणजे याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला असुन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. त्यांनी नुकतेच भाजपामध्ये आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. निकम यांनी कसाबला फाशीची शिक्षा देण्यात वकील म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. या लढतीकडे एक प्रतिष्ठेची लढत म्हणून बघितले गेले.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केला.

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला. प्रतापराव जाधव यांचा या मतदारसंघातून हा सलग चौथा विजय आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे. माजी संरक्षण राज्यमंत्री विद्यमान खासदार भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा त्यांनी पराभव केला.

लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांचा पराभव केला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बरणे यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे संजोय वाघेरे यांचा पराभव केला.

नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण विजयी झाले आहेत. त्यानी भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला. नांदेडचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपात प्रवेश करुन ते राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यांचं हे मोठं अपयश असल्याचं मानण्यात येत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रशांत गोडसे यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवार शिवसेनेचे होते. प्रशांत गोडसे यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यांना शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला.

पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा विजयी झाले आहेत. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव केला.

पुणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून फुटलेल्या वसंत मोरे यांना उमेदवारी दिली होत. त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. त्यांनी महायुतीच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला. अजित पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. अत्यंत हुषार आणि संसदेत मतदारसंघाचे प्रश्न मांडणारे खासदार म्हणून अमोल कोल्हे यांचा संसदरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले असुन त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.

शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा पराभव केला.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव केला.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!