Headlines
Home » जळगाव » अखेर सूरत गेट ते निमखेडी रस्त्याच्या डागडूजीस सुरवात ; ९ कोटींच्या काँक्रीट रस्त्याची आठ महिन्यातच लागली होती वाट !

अखेर सूरत गेट ते निमखेडी रस्त्याच्या डागडूजीस सुरवात ; ९ कोटींच्या काँक्रीट रस्त्याची आठ महिन्यातच लागली होती वाट !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या काही महिन्यांपासून प्रमुख तसेच कॉलनीतील रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरु आहेत. यातच गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी सूरत गेट ते निमखेडी ( जूना महामार्ग ) हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा करण्यात आला होता. अनेक वर्षानंतर या रस्त्याचे काम हाती घेतल्याने, तसेच शहरात जाण्यासाठी हा सोईचा मार्ग असल्याने परिसरातील नागरिकांना लॉटरी लागल्यामय आनंद झाला होता. एकाच टप्प्यात एवढ्या मोठ्या रस्त्याचे काम होणार, शिवाय काँक्रीटीकरण होणार… हे म्हणजे सगळं कसं स्वप्नवत वाटतं होते. कारण या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे, आणि धुळीचे प्रचंड साम्राज्य होते. पावसाळ्यात तर एखाद्या शेतातील रस्त्याने आपण चाललो तर नाही न ? असा प्रश्न निर्माण व्हायचा. या रस्त्यावर चारचाकीच काय दुचाकीही सोडा… पायी चालणे देखिल कठीण होऊन बसले होते.

दरम्यान हा रस्ता पूर्णपणे तयार झाल्याने शाळा, कॉलेज तसेच नोकरी कामानिमित्त शहरात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने सहाजिकच धोकेदायक राष्ट्रीय महामार्गावरील काही वाहतुक देखील या मार्गावर वळाली. मात्र पाच ते सहाच महिन्यात या नवीन बनवलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी बारीक तडे पडायला सुरवात झाली, आणि मागील एक महिन्याच्या कालावधीत या ९ कोटिंच्या काँक्रीटच्या रस्त्यावर सर्वत्र मोठ मोठे आणि लांबच लांब तडे, काही ठिकाणी शंभर फुटां पेक्षाही अधिक लांबीचे तर अडीच ते तीन इंच रुंदीचे तडे दिसू लागले.

सदर रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कालावधी हा दहा वर्षाचा असताना सहा-सात महिन्यांच्या आतच या रस्त्याची वाट लागल्याने दुरुस्ती करण्याची वेळ ठेकेदारावर आली. एकूणच या रस्त्याच्या कामाची गुणवत्ताही दिसून आली. शहरातील इतर रस्त्यांची अवस्था देखील यापेक्षा काही वेगळी नाही.

काँक्रीटचे रस्ते तयार झाल्यानंतर त्यावर गोणपाट टाकून दिवसातून एक दोन वेळा पाणी टाकले जाते. यामुळे निम्म्यापेक्षा पाणी हे वायाच जाते किंवा वाहून जाते. यात विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे रस्ता नुकताच तयार झालेला असतो, आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर पाणी मारण्या/ टाकण्यासाठी भला मोठा अवजड पाण्याचा टॅंकर चक्क त्या रस्त्यावर चालवला जातो. अनेक वाहनधारक तर रहदारीसाठी खुल्या नसलेल्या रस्त्यावर वेगाने वाहने चालवताना दिसतात.

तयार झालेल्या ओलसर रस्त्यावर गोणपाट टाकुन पाणी टाकण्यापेक्षा इमारतींच्या छतावर रेती आणि सिमेंट मिश्रित कच्च्या मालाचे आळे करतात तसे आळे करून त्यात पाणी साचवल्यास नक्कीच फरक पडेल. तसेच आळे असल्याने वाहनधारक देखील वेळेआधीच रस्त्याचा वापर करणार नाहीत, किंवा कोणी वाहनं नेलेच तर आळे असल्याने वेग हा मर्यादित राहील, किंवा स्पीड ब्रेकर सारखे दणके बसल्याने कदाचित तो पुन्हा त्यावर आपले वाहन नेणार नाही. रेती मिळत नाही किंवा खर्चीक आहे असे कारणे सांगण्यापेक्षा सुरुवातीला याकामात थोडा खर्च केला तर काही महिन्यातच दुरुस्ती करण्याची नामुश्की ओढवणार नाही.

सध्या सुरु असलेल्या सुरत गेट ते निमखेडी दरम्यान काँक्रीट रस्त्याचे दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन बघितले असता या कामात बारीक रेती, त्यात सिमेंट आणि एक केमिकल टाकून केलेले मिश्रण तड्यांमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतांना कामगार दिसले. प्रयत्नच म्हणावा लागेल… कारण पातळ मिश्रण केले असते तर सहज तड्यांच्या तळाशी जाऊन खालपासुनच मजबूत झाले असते. मात्र बघण्यात आलेला हा प्रकार थोडा वेगळाच दिसून आला. अशा प्रकारे वरवर मुलामा देऊन बंद केलेले तडे अजून किती दिवसांत मोकळा श्वास घ्यायला तयार होतात, ते लवकरच दिसेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!