चिंचपुरा ( वास्तव पोस्ट ) : “कापूस उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा समावेश करणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथील कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत शेती दिन कार्यक्रमावेळी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती होते.
कृषि विज्ञान केंद्र, जळगावच्या वतीने कापूस पिक विशेष प्रकल्प अंतर्गत शेती दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कृ. वि. के. चे विषयतज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी कापूस उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक अवजारांबाबत आणि यांत्रिकीकरणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे श्रमबचत होऊन उत्पादनवाढ शक्य असल्याचे सांगितले. तर कृषी संशोधन केंद्राचे डॉ.जी.बी. चौधरी यांनी सघन कपाशी लागवडीसाठी योग्य वाणांची निवड, त्यांचे फायदे आणि लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जळगावच्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहकार्याने करण्यात आले.
