Home » जळगाव » तलावात असंख्य मृत मासे आढळल्याने खळबळ; प्रशासनाने पंचनामा करून नमूने केले संकलित

तलावात असंख्य मृत मासे आढळल्याने खळबळ; प्रशासनाने पंचनामा करून नमूने केले संकलित

Manyarkheda Lake : मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांडपाणी तसेच MIDC परिसरातून रसायनयुक्त पाणी तलावात येत असल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनेक क्विंटल मासे मृत झालेले आढळून आले. इतक्या मोठ्या संख्येत मृत झालेल्या माशांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव एमआयडीसीतून केमिकल कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी हे तलावात सोडलं जात असल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. माशांबरोबरच तलावातील इतर जीवजंतू देखील मृत झाले आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

‘आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था’ यांचेकडून या तलावात कतला, लालपरी तसेच ब्रिगेड प्रजातीचे मत्सबीज सोडण्यात आले होते. अशाप्रकारे मत्सबीज टाकल्यानंतर ते साधारणतः पाच ते सहा महिन्याच्या कालावधीनंतर निघायला लागते. आणि जवळपास मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. १०ते१२ मच्छीमार या तलावात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शनिवारी ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृत मासे त्यांना आढळून आले.

दरम्यान मिळालेल्या माहीनुसार मागील दोन दिवसांपासून या ठिकाणी मासे मरत होते. पण शनिवारी मात्र मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. सदर घटनेमुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मच्छीमारांकडून मृत मासे जप्त करण्यात आले आहेत. गुरांना पाणी पिण्यासाठी तलावावर आणु नये, तसेच सांडपाणी म्हणून देखील या तलावाचे पाणी वापरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने गावात दवंडी देत करण्यात आले आहे.

घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवले. त्यानंतर लगेचच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी समन्वय साधून घटनास्थळी पंचनामा, नमुने संकलन आदी कार्यवाही पूर्ण केली. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!