कल्याण, दि.२२( वास्तव पोस्ट न्यूज )– कल्याण रेल्वे स्थानकाच्या १ नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर ५४ डेटोनेटर सापडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या ह्या डेटोनेटर मुळे कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीस, बॉम्ब शोध पथकं दाखल होऊन अधिक तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १ जवळ पिंपळाच्या झाडाखाली एका बॉक्समध्ये डेटोनेटरच्या ५४ कांड्या आढळून आल्या. रेल्वे स्टेशन परिसरात संशयीत स्थितीत बॉक्स आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या कांड्या ताब्यात घेतल्या असुन पुढील तपास सुरू आहे .दरम्यान या कांड्या या ठिकाणी कोणी ठेवल्या हे शोधण्यायासाठी रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्यान्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.
