Home » जळगाव » पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होत आहे गैरसोय

पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होत आहे गैरसोय

कजगाव ( प्रतिनिधी ) दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या तिसऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाखाली पाणी साचल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. पाण्याच्या खोलीमुळे शेतकरी व ये जा करणाऱ्या लोकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने येथे लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. पाणी साचुन झालेल्या गैर सोईमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. या ठिकाणी दि.२७ रोजी मोटरसायकल घसरल्याने बांबरुड येथील दोन जण पाण्यात पडले होते. तर दि.२८ रोजी भाऊसाहेब वाघ, नाना महाजन, जगन साठे हे शेतकरी शेतात बैलगाडीवर खत घेऊन जात असतांना पुलाखाली मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या पाण्यात बैलगाड्या पलटी झाल्या. प्रसंगावधान बघून गाडी हाकणाऱ्यांनी उड्या मारल्याने मोठी दुघर्टना टळली. सदर घटना गावात कळताच शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली. त्यांनी उलटलेली बैलगाडी दुसऱ्या बैलगाडीच्या साह्याने ओढत बाहेर काढली. या ठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा तळाशी साचलेल्या गाळाचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकली घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या काही महिन्यांपुर्वी रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या लाईनच्या कामाला वेगाने सुरुवात केली होती, मात्र ज्या ठिकाणी तिसऱ्या लाईनच्या कामात पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याच पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. सदरील पुलाखालुन वाडे, बांबरुड, गावांचा मुख्य रस्ता असल्याने येथील नागरिकांना तसेच दोन्ही बाजूच्या गावांच्या नागरिकांना तसेच शेतकरी वर्गाला देखील हा रस्ता सोईचा असल्याने याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो.

दरम्यान साचलेल्या पाण्यातुन जाण्यापेक्षा पर्यायी मार्ग म्हणून काही नागरिक आपला जीव मुठीत घेवून जवळच असलेली रेल्वे लाईन ओलांडून मार्गक्रमण करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर काही नागरीकांना अन्य फेऱ्याच्या मार्गाने ये जा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे लवकरात लवकर या पुलाखाली साचलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करुन मार्ग सुरळीत करावा. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबधीत ठेकेदारास योग्य त्या सुचना द्याव्यात अशी मागणी कजगाव, बांबरुड, वाडे या गावातील नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!