Home » महाराष्ट्र » विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय मूल्यांकन ; एकाचवेळी ७८२ जिल्ह्यात सर्वेक्षण !

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय मूल्यांकन ; एकाचवेळी ७८२ जिल्ह्यात सर्वेक्षण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी आणि सीबीएसईच्या सहकार्याने परख राष्ट्रीय सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला गेला. दि.४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर ७८२ जिल्ह्यामध्ये ८७६१९ शाळांमध्ये २३ लाख विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या २३ भाषांमध्ये हे सर्वेक्षण एकाचवेळी पार पडले.

परख म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय केलेले मूल्यांकन. सर्वेक्षणात इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इतर विषयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन यात केले गेले. इयत्ता नुसार प्रत्येक वर्गातील ३० विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले. जळगाव जिल्ह्याच्या या राष्ट्रीय सर्वेक्षणाचे महत्त्वपूर्ण जबाबदारी जिल्हा समन्वयक म्हणून सीबीएसई तर्फे ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांना सोपविण्यात आली होती.

जिल्हा समन्वयक सुषमा कंची यांच्यातर्फे संपूर्ण जिल्ह्यातून ऑब्झर्व्हर्सची नेमणूक करण्यात आलेली होती. परख राष्ट्रीय सर्वेक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांच्यातर्फे एकंदरीत तीन मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विशिष्ट वर्ग इयत्ता कशा पद्धतीने निवड करावी, तसेच विद्यार्थी निवड कशी करण्यात यावी याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्याच प्रकारे सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पॅकेजिंग कशा प्रकारे करण्यात यावे याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.

सीबीएसई चे प्रतिनिधी मनोज कुमार यांनी सर्व निरीक्षकांच्या भेटी घेऊन त्यांना त्यांच्या कर्तव्याबाबत जाणीव करून दिली एकंदरीत हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिमाणांचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने अधिकच उपयोगी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे तसेच डी.टी. पाटील आणि समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी सुषमा कंची आणि सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!