कजगाव दि.९ ( प्रतिनिधी ) –दिपक अमृतकर | भडगाव येथे महावितरणाच्या कार्यालयात बऱ्याच महिन्यांपासून अभियंता पद रिक्त असून ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान वेळेवर होत नसल्याने विज ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या समस्यांचे निवारण वेळेवर होत नसल्याची तक्रार गावातील नागरिकांकडून केली जात आहे. महावितरणाच्या या दिरंगाईच्या कारभारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र उन्हाळा असुन दिवसा लाईट नसल्याने शेतकऱ्यांना केळी व इतर पिकांना पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. मात्र तीन ते चार दिवसांपासून शेतातील लाईट वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन कजगाव महावितरण कार्यालयात असलेल्या रिक्त पदावर अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
प्रतिक्रिया : गेल्या चार दिवसांपासून रात्री भरणाच्यावेळी विजपूरवठा बंद असल्यामुळे विहिरीला मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
समाधान पवार ,शेतकरी कजगाव
