कोलकता ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बांगलादेशाच्या सिमेहुन निघालेले ‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला. चक्रीवादळासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे त्या परिसरातील घरे, शेत पाण्याखाली गेली आहेत. ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनही किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा तीव्र प्रभाव दिसून आला. या चक्रीवादळामुळे राज्यसरकारने जवळजवळ १ लाख ८० हजार लोकांना, शाळा, महाविद्यालये आदी सुरक्षित ठिकाणांवर हलवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे डायमंड हार्बर, सागर बेट, हिंगलाज, संदेशखळी या भागात नुकसान झाल्याची बातमी आहे. कोलकात्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ नेताजी सुभाषचंद्र बोस हे रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले. तसेच देशांतर्गत ३९४ आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सुंदरबनच्या गोसाबा परिसरात ढिगारा पडल्याने एक जण जखमी झाला आहे. दिघा शहराच्या किनारपट्टीवरील समुद्राच्या भिंतीवर मोठमोठ्या लाटांचे उग्र रूप दिसत आहे.
दरम्यान राज्याच्या किनारपट्टीवरील सर्व रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये असलेल्या पर्यटकांना बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल, बंगाल पोलीस, होमगार्ड, तसेच आपत्कालीन विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर ठेवण्यात आले आहेत.
