Home » महाराष्ट्र » माकपच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटोले यांची भेट

माकपच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटोले यांची भेट

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या तीव्र होत असलेल्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी आ. विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कराड, डॉ.अजित नवले, शैलेंद्र कांबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

लोकसभा निवडणुकीत दिलेल्या राज्यभरातील माकपच्या भरीव योगदानाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत माकपला किमान बारा जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात यासाठीचा प्रस्ताव आज माकपच्या वतीने त्यांना देण्यात आला.

डहाणू व विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे), कळवण, नाशिक (पश्चिम), दिंडोरी व इगतपुरी (नाशिक), सोलापूर (मध्य), अकोले (अहमदनगर), माजलगाव (बीड), किनवट (नांदेड) आणि पाथरी (परभणी) हे विधानसभा मतदार संघ लढविण्याची जोरदार तयारी माकपने सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. मागील आठवड्यात मा. शरद पवार यांचीही माकपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. लवकरच मा.उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार आहे.

राज्यात दुधाचा व कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २८ जून पासून विविध संघटना या प्रश्नावर रणांगणात उतरत आहेत. राज्यातील आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार यांच्या प्रश्नांवरही विविध कामगार कर्मचारी संघटना, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती,माकप व जन संघटना रणांगणात उतरत आहेत. आगामी अधिवेशनात कामगार, कर्मचारी, शेतकरी, असंघटित कामगार, शेतमजूर, व्यवसायिक, स्वयंरोजगार, लहान व मध्यम उद्योग यांचे हे प्रश्न केंद्रस्थानी आणावेत, असा आग्रहही माकपच्या शिष्टमंडळाने यावेळी नाना पटोले यांच्याकडे लावून धरला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकजुटेने रणांगणात उतरल्यास सत्ता परिवर्तन अटळ आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!