नांदेड | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी रात्री उशिरा आकस्मिक भेटी देऊन अनेक नाक्यांची तपासणी केली. त्यांच्या या भेटीमुळे यंत्रणा सतर्क झाली असून मोठ्या प्रमाणात नाकेबंदी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर खर्च निरीक्षक डॉ.जांगिड यांनी आपल्या अचानक दौऱ्यातून नांदेड शहर, भोकर, मालेगाव, कासारखेडा आदी ठिकाणच्या विविध स्थानिक निगराणी दलांच्या कामकाजाचा आढावा घेतला. याशिवाय भरारी पथककाच्या कामाविषयी देखील त्यांनी चौकशी केली.
नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नगदी रोकड, सोने, चांदी, मद्य व मादक पदार्थ व अन्य काही भेटवस्तू जप्त करण्यात आले आहे. डॉ.जांगिड यांच्याकडून वेळोवेळी अशा प्रकारे अचानक पाहणी केली जात असल्यामुळे निवडणूक काळातील तपासणी पथके सावध झाली आहेत. जिल्ह्यात सध्या २५ निगराणी केंद्र आहेत. २४ तास वेगवेगळ्या वाहनांची तपासणी केली जाते. तसेच ६० फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. या पथकाकडूनही गैरप्रकारावर नियंत्रण ठेवले जात आहे.
