मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरम्यान शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी, दर्जेदार शाळांसाठी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी मंडळी काम करतात. या सर्वांना न्याय द्यायचा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाबाबत अन्य राज्यांत काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम ही समिती करेल. शिक्षक प्रतिनिधी यांचाही समितीत समावेश राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, ज्ञानश्वर म्हात्रे, किशोर दराडे, जगन्नाथ अभ्यंकर, माजी आमदार ॲड. मनिषा कायंदे तसेच शिक्षक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते.
