Home » राजकीय » सांगलीत हक्क सांगितला कॉंग्रेसने, उमेदवार उतरविला उद्धव गटाने; फासे मात्र वंचित कडेच

सांगलीत हक्क सांगितला कॉंग्रेसने, उमेदवार उतरविला उद्धव गटाने; फासे मात्र वंचित कडेच

सांगली | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ साठी गेल्या अनेक दिवसांपासून सांगलीचा जागा वाटपाचा तिढा चालू होता. सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसने आपला हक्क सांगितला होता. इकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार आखाड्यात उतरवल्याचे जाहीर केले. आणि कुठल्याही परिस्थितीत ते आपली भूमिका बदलायला तयार नव्हते. त्यात वंचित बहुजन आघाडीच म्हणनं होतं की सांगलीत आमचा उमेदवार पळविला गेला. अशातच हा तिढा आणखीनच वाढत गेला.

महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद घेवून जागा वाटपाची आपआपली भूमिका जाहीर केली. तिकडे महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला गेली त्यामुळे नाना पटोले यांनी सांगितले की कुठेतरी त्यागाची भूमिका आम्ही ठेवत आहोत, काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागतील. या घडामोडीनंतर सांगलीत असलेल्या कॉंग्रेसच्या वर्तुळात मात्र निराशा दिसून आली. कुठेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिसले नाहीत किंवा कोणत्याही नेत्याने अथवा कार्यकर्त्याने पुढे येऊन सांगलीच्या जागेविषयी आपली भूमिका मांडली नाही.

प्रत्येक मतदार संघामध्ये सगळेच पक्ष आपआपल्या परिने उमेदवार बदलवित होते. त्यामुळे कॉंग्रेसचे विशाल पाटील आता कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानांच त्यांच्या मोठ्या भाऊने अकोल्यात जाऊन प्रकाश आंबेडकर यांची तडकाफडकी भेट घेतली. या भेटीत नेमकी क़ाय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नसेल तरी कॉंग्रेसचे विशाल पाटील हे तिकीटापासून वंचित राहिल्याने आता ते वंचित बहुजन आघाडीच्या सोबत जाऊन वंचितच्या तिकीटावर सांगलीच्या लोकसभा रणांगणात उतरणार की काय, असा मोठा प्रश्न यानिमित्ताने राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. विशाल पाटील हे भाजप विरोधी असल्याने ते भाजपात कदापी जाणार नाहीत, आणि अपक्ष लढण्यापेक्षा एखाद्या पक्षाकडून लढलेले केव्हाही चांगले राहील म्हणून त्यांनी आपल्या समविचारी पक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचा पर्याय त्यांनी निवडला असावा असे बोलले जात आहे.

प्रकाश आंबेडकार यांनी विशाल पाटील यांना सध्या फॉर्म भरण्याचे सांगून यावर लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले. जर वंचितने विशाल पाटील यांना संधी दिली तर सांगली मध्ये असलेला वंचितचा सर्व जातीधर्म समावेशित असलेला मोठा मतदार गट आणि विशाल पाटील यांचा कॉंग्रेसचा ठराविक मतदार यांच्या जोरावर विशाल पाटील नक्की बाजी मारणार असे विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे गेल्या लोकसभेत सांगलीत वंचितच्या उमेदवारामुळे मत विभाजनाचा फटका बसून पराभूत झालेल्या विशाल पाटील यांना आता तिच वंचित बहुजन आघाडी खासदार बनवणार का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!