Home » महाराष्ट्र » संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा ; चक्क आठ परीक्षार्थींनी दिली केंद्राबाहेरुन परीक्षा

संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा ; चक्क आठ परीक्षार्थींनी दिली केंद्राबाहेरुन परीक्षा

Computer typewriting exam scam : देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे. हा घोटाळा राज्यव्यापी असण्याची शक्यता नाकारता येत नाही .

बुलढाणा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बुलढाणा जिल्ह्यात संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे. यात ८ परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर न देता बाहेरून टंकलेखन परीक्षा दिली. घडलेल्या प्रकरणी परिषदेच्या आदेशावरून शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दिली आहे.

चिखली येथील एका महाविद्यालयात टंकलेखन परीक्षा केंद्रात माहिती तंत्रज्ञान शिक्षक आणि परीक्षार्थी यांच्या संगनमताने हा ऑनलाईन परीक्षा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. राज्यात १० जून ते १४ जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात संगणक टंक लेखन परीक्षेचे सात परीक्षा केंद्र आहेत.

दरम्यान १३ जून रोजी सत्र क्रमांक ४०३ चा पेपर होता. अनुराधा अभियांत्रिकी परीक्षा केंद्रावर बावीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. परीक्षा सुरु असतांना केंद्रात मात्र चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते. प्रत्यक्षात मात्र बावीस विद्यार्थ्यांनी ‘एक्सेस’ घेतल्याचे दिसून येत होते. त्यावेळी पुणे येथील राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांशी व्हिडिओ कॉल करुन त्यांना परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितले. यावेळी केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉक्टर बेडसे यांनी इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत याचा जाब विचारला असता केंद्रप्रमुख निरुत्तर झालेत.

अधिक माहीती घेतली असता, संगणकीय टंकलेखन या परीक्षेचा युजर आय डी आणि पासवर्ड हा फक्त परीक्षा केंद्र प्रमुखाकडेच असतो. मग हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या कानावरही हा विषय घालण्यात आला. तसेच याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!