जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
आज २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ‘पुढील तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही’ अशा आशयाचे संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी केली. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

नेमकी परिस्थिती काय?
सोमवारी दिवसभर परिस्थिती सामान्य असताना अचानक संध्याकाळी व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर इंधन पुरवठा बंद होणार असल्याच्या वावड्या उठल्या. यामुळे घाबरलेल्या वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी या रांगांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. विशेषतः शहरातील आकाशवाणी चौक, कोर्ट चौक आणि महामार्गालगतच्या पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा जनतेस महत्त्वाचा संदेश
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तातडीने निवेदन जारी करत जनतेला स्पष्ट संदेश दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
- साठा पुरेसा आहे: जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
- पुरवठा सुरळीत: इंधन पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा आलेला नाही, पुरवठा नियमित सुरू आहे.
- अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडियावर पसरणारे ‘पुरवठा बंद’चे संदेश पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत.
- घाबरून जाऊ नका: नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अनावश्यक गर्दी करू नये.

प्रशासन सतर्क
जिल्हा प्रशासनाने तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असून इंधनाचा पुरवठा विस्कळीत होणार नाही याची खात्री केली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नागरिकांनी संयम राखावा आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन ‘वास्तव पोस्ट’च्या वतीने करण्यात येत आहे.
