Home » जळगाव » सावधान : महामार्गावर दोन बळी घेणाऱ्या ‘त्या’ खड्डयाने डागडुजी नंतरही पुन्हा वासले ‘आ’…!

सावधान : महामार्गावर दोन बळी घेणाऱ्या ‘त्या’ खड्डयाने डागडुजी नंतरही पुन्हा वासले ‘आ’…!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क थांब्या दरम्यान दि.२८ ऑगस्ट, बुधवार रोजी दुपारी १:५० वाजेच्या सुमारास खोटेनगर कडून शहराच्या दिशेने येतांना महामार्गावर मधोमध असलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि ट्रकच्या मध्ये दुचाकी येऊन झालेल्या भीषण अपघातात एक विवाहिता व १६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुचाकीवर सोबतच असलेले विवाहितेचे दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले होते.

या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात शासन, प्रशासन, मंत्री, खासदार, आमदार, ठेकेदार यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळची परिस्थिती बघता महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचेकडून रातोरात त्या खड्डयाची खडी, डांबरने डागडूजी केली तर होती, पण पुढील पाच दिवसात म्हणजे दि.२ सोमवार रोजी खड्डयातले डांबर व खडी निघायला सुरवात झाली, आणि बरोबर एक आठवड्यानंतर

म्हणजे आज दि.४, बुधवार रोजी सकाळी ‘तो’ खड्डा ‘आ’ वासुन तयार ( ! ) आहे. या निमित्ताने ठेकेदाराने त्याच्या कामाची गुणवत्ता (?) पुन्हा एकदा दाखवून दिली.

दरम्यान नेहमीच अपघात होणाऱ्या या महामार्गावर आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत. तरी देखील अपघात रोखण्यासाठी कुठलीही ठोस अशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. दि.२८ ऑगस्ट रोजी झालेला अपघात आणि त्यानंतर दि.३१ ऑगस्ट रोजी दुसऱ्या एका अपघातात द्वारकानगर थांब्याजवळ एका वृद्ध व्यक्तिचा गेलेला नाहक बळी, यानंतर मात्र स्थानिक रहिवाशांनी राज्यसरकार, प्रशासन, पालकमंत्री, खासदार, आमदार, ठेकेदार यांच्या कार्यपद्धती विरोधात आवाज उठवत नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे या अपघातांमुळे मागील आठवड्यात गल्ली पासून थेट दिल्ली पर्यंतच्या राजकारणात महामार्गाचा विषय चर्चिला गेला. तसेच जळगाव येथील मान्यवर नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सदर भेटीत जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुर्दशेबाबत तसेच वळण रस्ता, गिरणा नदीवरील प्रस्तावित पुल, महामार्गाची रेंगाळलेली कामे याबाबत सविस्तर चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री नितीन गडकरी यांनी सदर महामार्गाची अवस्था माहिती असल्याचे सांगुन शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे कॉन्क्रीटीकरण नक्की करू असे सांगीतले. तसे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करत योग्य त्या सूचनाही दिल्या असल्याचे समजते.

आता ह्या फोन कॉलवर दिलेल्या सूचनांची प्रत्यक्षात अंबलबजावणी कधी होणार, अजुन किती दिवस प्रक्रियेला लागतील हे पुढील काही दिवसांत दिसुनच येईल. मात्र त्याआधी गेल्या बुधवारी दि.२८ ऑगस्ट रोजी महामार्गावर दोन निष्पाप बळी घेणाऱ्या ‘त्या’ जीवघेण्या खड्डयाचे त्याच रात्री केलेले डागडूजीकरण उखडले असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर नव्याने आणि कायमस्वरूपी डागडूजीकरण करावे एवढी अपेक्षा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!