Commercial Cylinder Price Cut : गॅस कंपन्यांनी आजपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५९८ रुपये झाली आहे.
मुंबई (वास्तव पोस्ट न्यूज ) : गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून नवीन बदल करण्यात आले असून व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे नवीन दर १ जुलै पासून लागू करण्यात आले आहेत.
◆ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
गॅस कंपन्यांनी आजपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. नवीन दरानुसार दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर आता १६४६ रुपयांना मिळणार आहे, जो याआधी १६७६ रुपयांना मिळत होता. मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५९८ रुपये झाली आहे, याआधी तो सिलेंडर १६२९ रुपयांना मिळत होता. कोलकत्त्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७५६ रुपये झाली आहे, जे याआधी १७७८ रुपये होती. चेन्नईत आता १९ किलोचा सिलेंडर १८०९.५० रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, हे नवीन दर आजपासून लागू करण्यात आले असून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे व्यावसायिकांना त्यांच्या खर्चात काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, घरगुती वापरात असलेल्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही कपात केलेली नाही. घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, चेन्नईत ८१८.५० रुपये आणि मुंबईत ८०२.५० रुपयांना किरकोळ विक्री होत आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात न झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. व्यावसायिक गॅसच्या दरात कपात झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी घरगुती गॅस धारकांना याचा लाभ होत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप आहे.
