Headlines
Home » महाराष्ट्र » गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन

गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन

गोंदिया ,दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना दीड लाखांवरुन आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. हे सरकार लोकाभिमुख असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्य शासनाने धानाला प्रथमच २० हजार रुपये बोनस दिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आणि राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी. एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!