Headlines
Home » क्राईम » जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली , दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की , जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी शिखरदीप बंगल्यात श्रीरामे हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्र. १ मध्ये ते सेवा बजावत होते. सध्या श्रीरामे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातील विश्रामगृहातच खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली.

गोळीबाराचा आवाज आल्यानंतर इतर सुरक्षा रक्षक घटनास्थळी धावत आले तेंव्हा त्यांना श्रीरामे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसलेत. या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे सुटीवरून बाहेर गावाहून गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!