Home » महाराष्ट्र » अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार ; महायुतीत नाराजी नाट्य !

अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार ; महायुतीत नाराजी नाट्य !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणीस लागले असुन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी महायुतीच्या तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याने नाराजीनाट्य दिसून येत आहे. अजित पवार यांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या परवानगीनेच सर्व खात्यांना निधी दिला जातोय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी देण्यावरुनच वादाची ठिणगी पडली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री वीजयकुमार गावित या मंत्र्यांनी अजित पवारांकडे अधिकच्या निधीची मागणी केली होती. पण अजित पवारांनी अधिकचा निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ बैठकीतलं वातावरण तापलेले होते. अजित पवार म्हणाले, ७ महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे १ लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी निधी देण्यास नकार दिल्याने तीनही मंत्री नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराज मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबाबतची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. या बैठकीनंतर महायुतीत आणखी नाराजगीच्या घडामोडी घडल्या आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्यानंतर अजित पवार यांनी काल रात्रीच थेट दिल्ली गाठली आणि दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली की नाराजी नाट्याबद्दलची चर्चा झाली हे मात्र गुपीतच आहे.

अजित पवार दिल्लीतून जावून आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? तसेच या सर्व घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस महायुती एकसंघ राहण्यासाठी परिस्थिती कशी हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!